शनिवार, २६ मार्च, २०११

प्रेम म्हणजे प्रेम असत

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. .. मी मिडल इस्ट मध्ये कामानिमित्त फिरत असतानाची .... माझ्या आयुष्यातील बरीच म्हणजे तब्बल १७ वर्षे मी मिडल इस्ट शी संबंधित राहिलो आहे. एकवेळ तर महिन्यातील १८ ते २० दिवस मी वेगवेगळ्या देशात फिरत असे. अगदी निजेरिया,इजिप्त पासून ते सर्व अखाती देशांचा ह्यात समावेश होता. सततच्या ह्या प्रवासामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा यायचा. सततच्या मिटींग्स, presentations , अवेळी प्रवास ह्या सर्वांचा अगदी कंटाळा आला होता. मग मी मनाचा शीण हलका करण्याकरिता एक मार्ग शोधला. विमानतळावर बोर्डिंग ची वाट बघत असताना मी आजूबाजूच्या प्रवाशांकडे आणि त्यंच्या activities कडे लक्षपूर्वक बघू लागलो. असे करत असताना मला अनेक गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या. नवनवीन व्यक्ती त्याचे हावभाव लकबी लक्षात ठेवण्याचा एक छंदच लागला. काही प्रसंग मनावर कोरले गेले आणि त्यातलाच हा एक .... मी कुवैत एअर पोर्ट वर दुबई ला जाण्यासाठी पोचलो. समान काहीच नव्हते त्यामळे सर्व सोपस्कार पूर्ण करायला फार वेळ लागला नाही. एक छानशी जागा पकडून बोर्डिंग ची वाट बघत बसलो. लागलेल्या सवई मुळे आजूबाजूला बघू लागलो. इतर विमानाच्या बोर्डिंग anouncements चालू होत्या. माझ्याजवळच काही कुवैती स्त्रिया घोळका करून उभ्या होत्या. खूप जाड असलेल्या ५ ते ६ बायकांनी एका लहान चणीच्या मुलीला अक्षरशः घोळात घेतले होते. एकमेकांमध्ये त्यांची चांगलीच चेष्टामस्करी चालू होती. हास्याची कारंजी उसळत होती. सर्वांच्या तोंडवर बुरखे असल्याने चेहेरे दिसत नव्हते पण त्यांच्या शरीरबोली वरून त्यांच्या आनंदाची कल्पना येत होती. आता मी त्यांच्या बरोबरच्या पुरुष मंडळींचा शोध घेऊ लागलो. थोड्याश्या अंतरावर फक्त ३ -४ मंडळी उभी होती. त्यांच्यात काहीतरी गंभीर चर्चा सुरु होती. मधूनच यातील एखादा 'त्या' घोक्यातील एखाद्या बाई शी काहीतरी बोलत असे (मला इतक्या वर्षात अजून कळले नाही कि हि पुरुष मंडळी आपापल्या 'बुरख्यातील' बायकांना कशी ओळखतात? असाच प्रश्न मला पुण्यातील मुली / बायका बद्दल पडतो. तोंडाला मुसक्या बांधून भरधाव वेगाने जाताना बघून अरे ... ही तर आपलीच.. असे त्यांचे मित्र / नवरे कसे काय सांगतात?). अचानक त्या सगळ्या ग्रुप मध्ये लगबग सुरु झाली. त्यांच्या विमानाची बोर्डिंग annoucement झाली असा मी अंदाज बांधला आणि तो खरा सुद्धा होता. त्या बारीक चणीची ती मुलगी प्रवासाला निघाली होती. तिचे दोन्ही हात मेंदी ने भरले होते. 'तो' सुद्धा आता 'तिच्या' हातात हात घालून उभा राहिला आणि त्या दोघांनी सर्वाना टाटा केला. त्याच बरोबर उरलेल्या सर्व स्त्रियांनी एक विशिष्ठ असा आवाज काढला (असा आवाज अरबी मंडळी आपल्या बोटांचा ओठांचा आणि जिभेचा वापर करून काढतात चांगल्या प्रसंगी काढतात. हा आवाज कसा असतो हे तुम्हाला ही ऐकता येईल .... हिंदी गाणं आहे न "हर किसी को नाही मिलता यहा प्यार" ह्यात तो आवाज आहे .... ). आता माझ्या लक्षात आले कि ही नवपरिणीत वधू 'तिकडच्या' घरी निघाली आहे. ती दोघं आता अगदी imigration ला जाण्या साठी निघाली.... मुलगी आता चागलीच कावरीबावरी झाली होती. इतक्यात एक वयस्कर अरब पुरुष पुढे आला आणि त्याने तिला हाक मारली. 'ती' ही बहुतेक याचीच वाट बघत होती.. चटकन तिने आपल्या जोडीदाराचा हात सोडला... आणि पळत त्या वयस्कर व्यक्ती ला बिलगली.... तिचा 'बाबा' होता तो! (अरबी भाषेत वडिलांना बाबा असेच म्हणतात) . त्यानेही तिच्या डोक्यावरून आपला थरथरता हात फिरवला .... आता ती निघाली... मागे वळून न पाहता निघून गेली... आणि त्याने आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली..... तो रडत होता... माझ्या १७ वर्षांच्या मिडल इस्ट मधील आयुष्यात रडणारा पहिलाच अरब मी पाहत होतो.... माझ्या विमानाची बोर्डिंग annoucement होत होती. मी निघालो .. पण एकाच खात्री पटली... कुठे ही जा... प्रेम म्हणजे प्रेम असत.... तुमचं आमच (आणि त्यांचेही) श्येम असत...! अभय

२ टिप्पण्या:

राजेन्द्र भंडारी म्हणाले...

अभयजी नमस्कार,
तुम्ही अनुभवलेला हा प्रसंग खरोखरच मनाला स्पर्श करुन गेला.

SHRINIVAS म्हणाले...

premala kal vel desh bhasha yachi bandhane nastat