सोमवार, २८ मार्च, २०११

'दादा' गिरी

खरतर हा शब्द आपण लहानपणापासून सतत वापरत आलो आहोत. तुम्ही म्हणाल आता ह्या शब्दावर काय लिहायचे? अहो खूप काही आहे ह्या शब्दात! आजूबाजूला जरा नीट बघाल तर नक्की कळेल की मी काय म्हणतोय ते. आज दादागिरी आपल्याला सगळीकडेच बघायला मिळते. अहो अगदी डार्विन चा सिद्धांत सुद्धा हेच सांगतो की ! 'सर्वैवल ऑफ दि फिटेस्ट' हाच तो सिद्धांत। आता फिटेस्ट म्हणजे कोण? डार्विनच्या मते कोणीही असो; माझ्या मते जो ताकदवान तो फिटेस्ट. मग आता पुढचा प्रश्न.... ताकदवान म्हणजे कोण? मनाने,शरीराने की पैशाने? आज ह्याच विषयावर जरा विचार करूया. अहो आपल्या लहानपणी "उगाच गावभर भटकतोस, जरा व्यायाम कर" असा प्रेमपूर्वक 'दम' रोज मिळायचा. "अरे शिकाला नाहीस ना तर मोलमजुरी करावी लागेल आणि त्यासाठी कमावलेले शरीर उपयोगी पडेल. जा व्यायाम कर लोळत पडण्यापेक्षा" अशी वाक्ये रोज घरोघरी ऐकू यायची. म्हणजे कमावलेले शरीर हे मोलमजुरी साठी उपयोगी पडते इथे पर्यंतच आपली झेप होती. कमावलेले शरीर हे कुस्ती सारखे मातीतले खेळ करण्यासाठीच असे मानणारा एक वर्ग होता (आणि आता ही आहे पण अतिशय कमी). अश्या पहिलवान लोकांना राजाश्रय सुद्धा मिळे. उदाहरण सांगायचे तर राजश्री शाहू महाराज! खरोखरी शरीराची ताकद ही सुखी आणि निरोगी जीवनाची किल्ली होती (आणि आजही आहे). तिचा (दूर)उपयोग दादागिरी साठी करावा इथपर्यंत विचार झालेला नव्हता.

गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. शरीर कामायचे आणि त्या जोरावर दादागिरीचा 'पास' मिळवायचा हा एक उत्तम मार्ग अनेकांना समजलाय. अशी पहिलवान मंडळीना जसा पूर्वी मिळायचा तसा आज सुद्धा 'राजाश्रय' मिळतो. अर्थात दोन्ही मध्ये कमालीचा फरक आहे हे सांगायला नकोच. कडक स्टार्च केलेला सफेद कपड्यातील 'काळ्या' मनाची ही मंडळी कपाळावर मोठा टिळा लावून सभ्यतेचा खोटा बुरखा पांघरतात. आपल्या सारखे अनेक लोक ह्या पोसलेल्या 'पोळ' मंडळीना चांगले ओळखून असतो. पण 'राजाच्या' बैलाला अडविण्याचा गाढवपणा कोण करणार? आणि हीच आजची शरीराच्या ताकदीने सुरु असलेली 'दादा'गिरी!


पैशाच्या जोरावर सुरु असलेली दादागिरी ह्या विषयावर ग्रंथ लिहिता येईल. आणि ह्या प्रकारच्या दादागिरीला इतिहास सुद्धा आहे. जनतेची पिळवणूक करणारे राजे, गरिबांना लुटणारे सावकार ते भांडवलशाहीच्या मुलतत्वापर्यंत ह्याची पाळेमुळे खोल रुतली आहेत. त्यांचा परामर्श घ्यायला वेगळेच व्यासपीठ लागेल. रोजच्या जीवनातील उदाहरणे सुद्धा खूप आहेत.जागतिक स्तरावर सुद्धा आपण ह्याचे परिणाम पाहतो. इराण वर लादलेली आर्थिक नाकेबंदी असो किंवा भारतावर अमेरिकेने घातलेला आर्थिक बहिष्कार असो. पैशाच्या जोरावरची दादागिरी अगदी जागतिक पातळीवर सुद्धा चालू आहे आणि त्या मागे अमेरिका, ब्रिटन सारखे 'जागतिक गुंड' आहेत हे कोणीही सांगेल. मनाच्या जोरावर होणाऱ्या दादागिरी चे वेगवेगळे पैलू आहेत. ह्या प्रकाराला शास्त्रीय आणि वैचारिक तसेच पारमार्थिक बैठक सुद्धा आहे. आजच्या कॉर्पोरेट जगतात त्याला 'माइंड गेम' असे म्हणतात. माझ्या मते 'चाणाक्यनिती' हे त्याचे आद्य प्रवर्तक म्हणावे लागेल. महाभारतात सुद्धा ह्या 'माइंड गेम' च्या जोरावर अनेक वेळा पांडवाचा विजय सुकर झाला. प्रभू रामाने सीतेचा केलेला त्याग (एका धोब्याने केलेल्या आरोपामुळे) हे सुद्धा माझ्या मते 'माइंड गेम' चेच उदाहरण आहे. शिवरायांचा 'गनिमी कावा' हे तर 'माइंड गेम' चे उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. कुठूनही आपल्यावर शिवाजी राजांचे मावळे तुटून पडतील ह्या मानसिक भीतीने शत्रूची लढण्याची ताकद निम्मी झालेली असे. अशी दादागिरी मलाही आवडते. पण एखाद्याची जमीन लाटण्यासाठी रोज त्याचा घरी गुंड पाठवण्याचा जो खेळ चालू आहे तो मात्र ह्या 'माइंड गेम' ची काळी बाजू आहे. आणि ही प्रवृत्ती समाजात वाढीस लागली आहे. एकतर्फी प्रेमामधून मुलींवर होणारे हल्ले किंवा ह्या त्रासाला कंटाळून काही जणींनी आयुष्याचा घेतलेला निरोप ही ह्या दादागिरीची शोकांतिका आहे. अनेक भारतीय नेते ही मनाची दादागिरी कशी, कुठे आणि केंव्हा करावी हे उत्तम जाणतात. सरकार स्थापना असो व टीकेत वाटप असो, ही मंडळी आपला खेळ मांडतात आणि नेत्यांना भंडावून सोडतात. अहो हेच काय घरात लहानमुले सुद्धा कधी कधी (बहुतेक वेळा!) आपल्यावर 'ही' दादागिरी करतात. अशी ही मनाची दादागिरी आपलेच एक मन आपल्याच दुसरया मनावर करत असते आणि मग नकळत अनेक पावले दारूच्या गुत्त्या (किंवा बार!) कडे वळतात. 'माइंड गेम' मध्ये खेळ सुद्धा मागे नाहीये. क्रिकेट, फुटबॉल इ. खेळामधील कॉमेंट्स म्हणजे काय? आज काळ जो तणाव (स्ट्रेस) आपण सर्व जण अनुभवतो तो ह्या प्रकारच्या दादागिरीचेच 'अपत्य' आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये ह्या वर ही उपाय सांगितला आहे. 'मेडीटेशन' (सर्वाना समजेल अश्या मराठीत हा शब्द लिहिला आहे!) हा त्या वरील हमखास आणि रामबाण उपाय. पारमार्थिक प्रकारात भक्ती, उपासना चिंतन मनन असे मार्ग ही तणावमुक्ती साठी उपयोगी पडताना दिसतात.


मी सुरवातीला लिहिल्याप्रमाणे दादागिरी बद्दल खूप काही लिहिता येईल. जाता जाता सौरभ गांगुलीच्या 'दादा' गिरीचा ही उल्लेख करावासा वाटतो. भारतीय संघाची घडण करताना आणि त्यांना मानसिक बळ देताना, 'दादा' ही दादागिरीच कामाला आली. आणि हो सध्या अजून एक 'दादा'गिरी गाजत आहे ॥ कोणाची काय विचारताय? अहो बारामतीकरांची.. अभय.



शनिवार, २६ मार्च, २०११

प्रेम म्हणजे प्रेम असत

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. .. मी मिडल इस्ट मध्ये कामानिमित्त फिरत असतानाची .... माझ्या आयुष्यातील बरीच म्हणजे तब्बल १७ वर्षे मी मिडल इस्ट शी संबंधित राहिलो आहे. एकवेळ तर महिन्यातील १८ ते २० दिवस मी वेगवेगळ्या देशात फिरत असे. अगदी निजेरिया,इजिप्त पासून ते सर्व अखाती देशांचा ह्यात समावेश होता. सततच्या ह्या प्रवासामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा यायचा. सततच्या मिटींग्स, presentations , अवेळी प्रवास ह्या सर्वांचा अगदी कंटाळा आला होता. मग मी मनाचा शीण हलका करण्याकरिता एक मार्ग शोधला. विमानतळावर बोर्डिंग ची वाट बघत असताना मी आजूबाजूच्या प्रवाशांकडे आणि त्यंच्या activities कडे लक्षपूर्वक बघू लागलो. असे करत असताना मला अनेक गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या. नवनवीन व्यक्ती त्याचे हावभाव लकबी लक्षात ठेवण्याचा एक छंदच लागला. काही प्रसंग मनावर कोरले गेले आणि त्यातलाच हा एक .... मी कुवैत एअर पोर्ट वर दुबई ला जाण्यासाठी पोचलो. समान काहीच नव्हते त्यामळे सर्व सोपस्कार पूर्ण करायला फार वेळ लागला नाही. एक छानशी जागा पकडून बोर्डिंग ची वाट बघत बसलो. लागलेल्या सवई मुळे आजूबाजूला बघू लागलो. इतर विमानाच्या बोर्डिंग anouncements चालू होत्या. माझ्याजवळच काही कुवैती स्त्रिया घोळका करून उभ्या होत्या. खूप जाड असलेल्या ५ ते ६ बायकांनी एका लहान चणीच्या मुलीला अक्षरशः घोळात घेतले होते. एकमेकांमध्ये त्यांची चांगलीच चेष्टामस्करी चालू होती. हास्याची कारंजी उसळत होती. सर्वांच्या तोंडवर बुरखे असल्याने चेहेरे दिसत नव्हते पण त्यांच्या शरीरबोली वरून त्यांच्या आनंदाची कल्पना येत होती. आता मी त्यांच्या बरोबरच्या पुरुष मंडळींचा शोध घेऊ लागलो. थोड्याश्या अंतरावर फक्त ३ -४ मंडळी उभी होती. त्यांच्यात काहीतरी गंभीर चर्चा सुरु होती. मधूनच यातील एखादा 'त्या' घोक्यातील एखाद्या बाई शी काहीतरी बोलत असे (मला इतक्या वर्षात अजून कळले नाही कि हि पुरुष मंडळी आपापल्या 'बुरख्यातील' बायकांना कशी ओळखतात? असाच प्रश्न मला पुण्यातील मुली / बायका बद्दल पडतो. तोंडाला मुसक्या बांधून भरधाव वेगाने जाताना बघून अरे ... ही तर आपलीच.. असे त्यांचे मित्र / नवरे कसे काय सांगतात?). अचानक त्या सगळ्या ग्रुप मध्ये लगबग सुरु झाली. त्यांच्या विमानाची बोर्डिंग annoucement झाली असा मी अंदाज बांधला आणि तो खरा सुद्धा होता. त्या बारीक चणीची ती मुलगी प्रवासाला निघाली होती. तिचे दोन्ही हात मेंदी ने भरले होते. 'तो' सुद्धा आता 'तिच्या' हातात हात घालून उभा राहिला आणि त्या दोघांनी सर्वाना टाटा केला. त्याच बरोबर उरलेल्या सर्व स्त्रियांनी एक विशिष्ठ असा आवाज काढला (असा आवाज अरबी मंडळी आपल्या बोटांचा ओठांचा आणि जिभेचा वापर करून काढतात चांगल्या प्रसंगी काढतात. हा आवाज कसा असतो हे तुम्हाला ही ऐकता येईल .... हिंदी गाणं आहे न "हर किसी को नाही मिलता यहा प्यार" ह्यात तो आवाज आहे .... ). आता माझ्या लक्षात आले कि ही नवपरिणीत वधू 'तिकडच्या' घरी निघाली आहे. ती दोघं आता अगदी imigration ला जाण्या साठी निघाली.... मुलगी आता चागलीच कावरीबावरी झाली होती. इतक्यात एक वयस्कर अरब पुरुष पुढे आला आणि त्याने तिला हाक मारली. 'ती' ही बहुतेक याचीच वाट बघत होती.. चटकन तिने आपल्या जोडीदाराचा हात सोडला... आणि पळत त्या वयस्कर व्यक्ती ला बिलगली.... तिचा 'बाबा' होता तो! (अरबी भाषेत वडिलांना बाबा असेच म्हणतात) . त्यानेही तिच्या डोक्यावरून आपला थरथरता हात फिरवला .... आता ती निघाली... मागे वळून न पाहता निघून गेली... आणि त्याने आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली..... तो रडत होता... माझ्या १७ वर्षांच्या मिडल इस्ट मधील आयुष्यात रडणारा पहिलाच अरब मी पाहत होतो.... माझ्या विमानाची बोर्डिंग annoucement होत होती. मी निघालो .. पण एकाच खात्री पटली... कुठे ही जा... प्रेम म्हणजे प्रेम असत.... तुमचं आमच (आणि त्यांचेही) श्येम असत...! अभय

शुक्रवार, २५ मार्च, २०११

गर्वाचे घर खाली!

(अ) प्रिय पोंटिंग,
काल जेव्हा युवी ने खणखणीत चौकार ठोकून भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले त्या वेळी तुझ्या एरवी मुजोर असलेला पण पडलेला चेहेरा बघून मला मला इयत्ता दुसरीत शिकलेली म्हण सतत आठवत होती गर्वाचे घर खाली !
कालच्या सामन्यातील दोन विलक्षण प्रसंगांची तुला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे. तू तर मैदानातच होतास आणि प्रत्यक्ष साक्षीदार होतास.
प्रसंग १: सचिन तेंडूलकर बाद झाला तो
प्रसंग २: गंभीर चा झेल घेतल्याचे अपील नामंजूर झाल्यावर त्याला तू केलेले चालेंज
पहिल्या प्रसंगात सत्यवान सचिन समोर असल्यामुळे अम्पायर ला सुद्धा निर्णय तपासून घ्यायची गरज भासली. इथे परत एकदा लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सचिन परत जायला निघाला होता! त्याच्या ब्याटला चेंडू लागून विकेटकीपर कडे गेला आणि सचिन देवा च्या मते ह्यासाठी अम्पायची परीक्षा घ्यायची अजिबात गरज नसते (बघ पटतंय का).
आता दुसरा प्रसंग पहा. गंभीर चा झेल घेतला म्हणून मिरवणारे तू आणि तुझी टीम! पण पर्यायाने साऱ्या जगाला काय दिसले? दिसले कि चेंडूचा टप्पा पडून तो फिल्डर च्या हातात विसावला होता. पुन्हा एकदा खोटारडेपणा समोर आला. आमच्या कडे (आणि तुमच्या कडेही) मांजर नावाचा प्राणी आहे. तो काय करतो कि दूध पितो. पण ते पिताना डोळे मिटून घेतो बरका. का माहितेय? त्याला वाटते कि आपण डोळे मिटले म्हणजे कोणी आपल्याला पाहत नाही! कळतय का मी काय म्हणतोय ते?
कदाचित (नाही माझी पूर्ण खात्री आहे कि) तू क्रिकेट मध्ये 'खोटे कसे खेळावे' ह्याची परीक्षा 'गोल्ड मेडल' मिळवून पास झाला आहेस. त्यामुळेच तुला जनाची तर नाहीच पण मनाची सुद्धा ... नाहीच. असे कोर्सेस आमच्या भारतात उपलब्ध नाहीत ( पण फक्त खेळाच्या बाबतीत बरका!).
स्लेजिंग करून, समोरच्या संघाला प्रोवोक करून जिंकण्याचे रडी डाव खेळून मिळालेले जगज्जेतेपद काय कामाचे रे? केवळ गोरी कातडी म्हणून "मी सांगेन ती पूर्व दिशा" सांगण्याचे आणि इतरांनी ऐकण्याचे दिवस गेले. पर्थ च्या खेळपट्टीवर तुझा माज आमच्या शिलेदारांनी उतरवला ते तू विसरलास का रे?
सचिन बरोबर स्वतःची तुलना करतोस न त्या वेळेला आमच्या मराठीमधील एक गोष्ट आठवते..... "बेडकी कितीही फुगली तरी तिला बैल होता येत नाही" जाऊ दे तुला नाही कळणार हे सगळ.
सध्या कुठल्यातरी 'संस्कारवर्गात' जा. हे काय असते हे माहित नसेल तर सचिन चा फोटो घरात लाव... काहीतरी चांगली प्रेरणा मिळेल.
लोभ नसावा
भारतीय

बुधवार, २३ मार्च, २०११

भारतीय मिडिया

भारतीय मिडिया (मिडिया म्हणजे मला इथे इलेक्ट्रोनिक मिडिया अभिप्रेत आहे)।किती परिपक्व आहे हा एक मोठ्ठा प्रश्न माझ्या डोक्यात गेले कित्येक दिवस घोळतोय. माझी खात्री आहे कि हाच प्रश्न आपल्याही मनात येत असेल. मिडिया हा लोकशाहीचा चौथा स्थंभ असतो हे आपण सगळे ऐकतो आहोत. इथे दोन मुख्य प्रश्न उभे राहतात १. भारतातल्या लोकशाहीचे उरलेले तीन स्तंभ किती भक्कम आहेत? २. चौथा स्तंभ किती परिपक्व आहे?
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला फारशी अक्कल लागणार नाही। लोकशाहीतील गुंडांनी जे काही प्रताप केले आहेत ते आपल्या समोर रोज येत आहेत. ह्यात कोणत्याही एका पक्षाचा सहभाग नसून " मिळून सारे खाऊ भरभर" ह्या पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. पैसे कमविण्याचा सर्वात सोप्पा व्यवसाय म्हणजे राजकारण !
माझ्या सारखे आणि बहुतांश तुमच्यासारखे फक्त बंद खोलीत वादळी चर्चा करणार आणि 'त्यांना' शिव्या देणार। काहीजण तर हे सुद्धा न करता 'जाऊ दे न , आपण बोलून काय होणार?' असे म्हणून वीकेंड पार्टी मध्ये गुंग होणार. ह्या परिस्थितीचा फायदा मात्र ह्या कोल्ह्या आणि लांडग्यांचा होतो. त्याच्या अवैध कारवायांना उत येतो आणि त्यांच्या निर्लज्ज वर्तनाने आपल्याला त्या 'जाड' कातडीचे प्रदर्शन घडते.


आज ह्या लोकांची दादागिरी इतकी वाढली आहे कि आपल्यासारखी मणसे जीव मुठीत धरून राहत आहेत.
हे सगळा आजूबाजूला होत असताना 'आम आदमी' मिडिया कडे एका अपेक्षेने पाहतो आहे। लोकशाहीच्या ह्या महत्वाच्या स्तंभा ची भूमिका खूप निर्णायक आहे। स्वातंत्र्यापूर्वी जनजागृतीचे जे काम वृत्तपत्रांनी केले तेच काम आज इलेक्ट्रोनिक मिडिया ने करावे अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र अगदीच उलटे दिसते. आज टीवी वरील बहुतेक चंनेल्स हि राजकीय पक्षांच्या हातातली बाहुले झाली आहेत. कित्येकवेळा असेही दिसून येते कि एखादी 'ब्रेंकिंग न्युज' एखादे चांनेल सतत दाखवीत राहते. कोणत्यातरी पक्षावर ती न्युज चांगलीच शेकणार असते. माझ्या सारख्या माणसाच्या अपेक्षा पण वाढतात. असे वाटते कि खरच आता मोठ्या धेंडांचा पर्दाफार्श होणार, पण तेवढ्यात काहीतरी 'चमत्कार' होतो आणि ती न्युज त्या चानेल वरून गायबच होते! ह्या मागील रहस्य हे उघड आहे आणि हीच मिडिया ची एक मोठ्ठी शोकांतिका सुद्धा.
निर्भीड पत्रकारिता ही आता इतिहास जमा होते आहे.
मिडिया वरील बातमीदार - हे सुद्धा एक मनोरंजनाचे साधन आहे. ज्यांनी सार्वजनिक जीवन २/ ४ वर्षापेक्षा जास्त दिवस अनुभवले नाही अशी मंडळी आपल्यायला राजीकीय भाकिते आणि Expert comments देताना दिसतात. २४ तास काहीतरी दाखवावेच लागणार म्हणून कुठल्यातरी बातम्या प्रेक्षकाच्या माथी मारण्याचे काम सुरु ठेवायचे। बातम्या ५ मिनिटे आणि जाहिराती ८ ते १० मिनिटे असे ह्याचे स्वरूप आहे. हे बदलायला हवे. बातमी हि तिच्या मूळ रूपात पोचविणे हे मुख्य काम मिडिया विसरली आहे असे दिसते. म्हणूनच मला वाटते कि हा चौथा स्तंम्भ जो पर्यंत व्यावसायिक स्पर्धेतून बाहेर येणार नाही तो पर्यंत त्याचा अपेक्षित परिणाम हि होताना दिसणार नाही. काही थोडे अपवाद वगळता मिडिया हा एक व्यवसाय झाला आहे. समाजाचा हा 'आरसा' तितकासा पारदर्शक दिसत नाहीये।

अभय

मंगळवार, २२ मार्च, २०११

खेळ अणि मनासिकतेची घालमेल

सध्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची धामधूम सुरू आहे. अनेक दिग्गज प्लेयर्स ह्यानिमित्ताने आपल्या समोर रोज खेळत आहेत. ही स्पर्धा प्लेयर्स प्रमाणेच पंचांच्या निर्णयावर व त्यावर केलेल्या अपिलामुळे ही सतत चर्चेत राहिली आहे. भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात तर चर्चेला उधाण आले आहे. कोण कसा चुकला , कोणी bowling कशी केली , त्याने कशी विकेट फेकली असे विश्लेषण चौकाचौकात चालू आहे. तर धोनी चे काय चुकते अणि भज्जी ने कुठे बोंल टाकावा असे सांगणारे सल्लागार ही पावलोपावली भेटतात. टीवी चनेल्स वर क्रिकेट ची ब्यँट सुद्धा न पाहिलेले आपली मते देत असतात. ज्योतिष्याना ही आपली कला सादर करायची संधी मिलाली आहे अणि दोन ज्योतिषी वेगावेगले भविष्य सांगून आपलाच दावा कसा खरा हे पटवायला बघत आहेत. एकंदरीत खेळाच्या निमिताने लोकांच्या मानसिकतेचे अनेक पैलू समोर येताना दिसतात.
ह्या स्पर्धेच्या वेळी प्लेयर्स च्या मनासिकतेची पण कसोटी लगते. त्यात बरेसचे फेल होतात कही तरुन जातात. माझ्या मते ह्या सर्वात खिलाडुवृत्ति फार महत्वाची. प्रत्येक खेळासाठी निकोप स्पर्धा हाच निकष लागू होतो पण आज क्रिकेट मध्ये स्लेजिंग आल्या पासून त्याला युद्धाचे रूप आले आहे. विजयासाठी काहीही हाच हेतु पण असे करताना खेळातील प्रमाणिकता कमी होतेय. उदहारण घ्यायचे तर सचिन अणि पोंटिंग पेक्षा दुसरे असूच शकत नाही. पोंटिंगने खोटारडेपणाचा तर सचिनने सत्यावादाचा कळस गाठला आहे. 'Gentlemen Game ला काळे फासायचे काम ऑस्ट्रलियन खेळाडू पूर्वीपासूनच करत आहेत अणि पोंटिंग तर त्यांचा शिलेदार ! सचिनने दाखविलेला मार्ग ह्या लोकांच्या डोक्यात जाणारच नाही कारण तो संस्कृतीचा फरक आहे.
काहीही असो खेळ अणि मनासिकतेची घालमेल अशीच चालू राहणार पण सरतेशेवटी खेळातली निकोप स्पर्धा वाढीस लागली पाहिजे अणि प्रत्येक खेलाडूने प्रमाणिकपणे ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.























शिवजयंती

आज श्री गजनानाला वंदून हें मराठी ब्लॉग वरील पाहिले पुष्प सादर करतो

आज तिथीने महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत आहेशिवराय फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारत देशाचे स्फूर्तिस्थान आहेत ह्यात दूमत नाही. आज ज्या उत्साहात शिवजयंती साजरी होते आह़े ते बघून आनंद वाटतो पण तरीही मनाच्या एक कोपऱ्यात अशीही शंका येते की हे सर्व काही खरच शिवरायांच्या प्रेमापोटीच चालू आहे ?

भव्य मंडप अणि कमानी उभरायच्या, मग कोणातरी नेता येणार , शिवरायांच्या प्रतिमेला हार घालणार अणि मग शिवराय हे कसे राजे होते हे सांगणार. त्यांचे शासन कसे स्वच्छ होते हे पटवून देणार, वर हें ही सांगणार की आपण हें सर्व आचरणात आणले पाहिजे (!) अणि हा समारंभ संपणार.

नंतर हे सगळे 'शिवप्रेमी' शेजारच्याच बार मध्ये जाउन दारू ढोसणार आणि नेत्यांची चापलूसी करत बसणार. आणि यांचे कार्यकर्ते आया बहिणींची थट्टा करायला मोकाट.

"शिवरायाचे आठवावे रूप , शिवरायाचा आठवावा प्रताप"

माला सांगा की ह्या नेच्यांची शिवारायान्सारख्या राजा बद्दल बोलण्याची काय लायकी आह़े? त्यांच्या स्वच्छ कराभारावर बोलताना ह्याना मानत लाज कशी वाटत नसेल ह्याची मोठी गम्मत वाटते आणि कीव पण येते.

इतका मोठा आदर्श राजा आपल्या महाराष्ट्रात जन्मला अणि ही नेते मंडळी त्याचे ही राजकारण करताना दिसतात. आज खरच आपल्याला जरूर आहे ती शिवरायांची ! ते आज असते तर ह्या सर्व भ्रष्ट नेत्यांचा कडेलोट अटळ होता

हें पाहिले पुष्प शिवरायाना अर्पण

अभय